Monday, November 16, 2009

हर्बल लिकरचा साक्षात्कार आदिवासींचा पूरक आहार हिरावणारा

दैनिक लोकसत्ता मधील बातमी

हर्बल लिकरचा साक्षात्कार आदिवासींचा पूरक आहार हिरावणारा
ह.भ.प. पाचपुतेंच्या ‘मोहा’ वर समाजसेवकांची टीका
चंद्रपूर, १६ नोव्हेंबर/प्रतिनिधी
राज्य निर्मिती होऊन पन्नास वष्रे लोटली तरी आदिवासींना त्यांच्या मुलभूत गरजा पुरवू न शकलेल्या राज्यकर्त्यांना पुन्हा एकदा आदिवासींना लुटण्याचा 'मोह' जडला आहे. गेली पाच वष्रे वन खात्याची वारीच्या नावाखाली पुरती धुळधाण उडवल्यानंतर आदिवासी विकास खात्याचे मंत्री बबनराव पाचपुते यांना झालेला हर्बल लिकरचा साक्षात्कार आदिवासींचा पुरक आहार हिरावून घेणारा आहे, अशी टीका या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी केली आहे.
आपण पंढरीचे वारकरी आहोत, असे सांगणाऱ्या पाचपुतेंना वन खात्याचे मंत्री म्हणून काम करतांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोह जडला होता. यातून झालेल्या उलाढालीने अनेकांचे डोळे दिपून गेले होते. याच खात्यात असतांना त्यांची नजर जंगलात आढळणाऱ्या मोह फुलांवर गेली होती. तेव्हाच त्यांनी मोहापासून दारू तयार करण्याची कल्पना वनाधिकाऱ्यांसमोर बोलून दाखवली होती. हे काम खात्याचे नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगून पाहिले पण, पाचपुते हटायला तयार नव्हते. आता साहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांच्याकडे अजूनही गरीब व अशिक्षित असलेल्या राज्यातील नऊ टक्के आदिवासींचा विकास साधण्याचे काम आले आहे. हा विकास फक्त दारू निर्मिती करूनच होऊ शकतो, असा साक्षात्कार पाचपुतेंना झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पाचपुतेंच्या या विधानावर आदिवासी भागात काम करणाऱ्या समाजसेवकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
गडचिरोलीत सर्चच्या माध्यमातून काम करणारे प्रसिध्द ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी हा हर्बल वाईनचा प्रकार आदिवासींना लुटण्याचा नवा मार्ग आहे, अशी टीका बोलतांना केली. जंगलात मिळणारे मोहफुल हे आदिवासींच्या आहाराचे साधन आहे. आदिवासी मोहाचा वापर पुरक आहार म्हणून करतात. आता तोच मोह जर दारू निर्मितीसाठी सरकार वापरणार असेल तर आदिवासींच्या तोंडचा घासच आपण हिरावून घेत आहोत, याची जाणीव पाचपुतेंना तरी आहे काय, असा संतप्त सवाल डॉ. बंग यांनी उपस्थित केला. राज्याची निर्मिती होऊन पन्नास वष्रे झाली तरी आदिवासी जिथल्या तिथेच आहे. कोटय़वधी रुपये खर्चूनही त्यांच्या साध्या प्राथमिक गरजा सरकार पूर्ण करू शकले नाही. आता हे दारूचे आमिष दाखवले जात आहे. मुळात पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना विकास म्हणजे साखर कारखानदारी, त्यातून तयार होणारी देशी दारू, हेच तत्व अवगत आहे. नेमका तोच प्रकार पाचपुते यांनी आदिवासींच्या बाबतीत सुरू केला आहे. केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी आदिवासींना मोहात पाडण्याचा हा प्रकार अतिशय घातक आहे, असे ते म्हणाले. आज आदिवासींना मोहाची दारू गाळण्याची परवानगी आहे. ही पध्दत कितीही तंत्रशुध्द केली तरी या दारूचा वास इतरांना सहन होणे शक्य नाही, अशा स्थितीत सरकार ही दारू बाहेर विकू शकणार नाही. मग हीच दारू आदिवासींनी दहा पट जास्त दराने बाजारातून विकत घेऊन प्यावी, अशी पाचपुतेंची अपेक्षा आहे काय, असा संतप्त सवाल डॉ. बंग यांनी उपस्थित केला. मागेही याच महोदयांनी हा मुद्दा मांडला होता. तेव्हा न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, शांताराम पोटदुखे यांना सोबत घेऊन २५ हजार आदिवासींच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मोहापासून दारू बनवण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही, असे उत्तर दिले. तरीही पाचपुते तोच राग आळवत असतील तर ते मुख्यमंत्र्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असेच म्हणावे लागेल, असे डॉ. बंग म्हणाले. गेल्या तीस वर्षांंपासून आदिवासी भागात काम करणारे मोहन हिराबाई हिरालाल यांनीही पाचपुतेंची ही भूमिका आदिवासींना आणखी नागवणारी आहे, अशी टीका आज बोलतांना केली.

1 comment:

  1. You have raised very important issue.
    I doubt if Mr. Babanrao PAchpute will realise what he is doing.

    ReplyDelete