Wednesday, September 9, 2009

गडचिरोलीत मोहफुलापासून दारुचा करखाना होणे नाही

गडचिरोलीत मोहफुलापासून दारुचा करखाना होणे नाही

शासनाचा समाजसेवकांना प्रतिसाद

महाराष्‍ट्राच्‍या दोन मंत्र्यांनी डिसेंबर महिन्‍यात नागपूरला असे वक्‍तव्‍य केले होते की गडचिरोली जिल्‍ह्यात लवकरच मोहफुलापासून दारु निर्मितीचा कारखाना सुरु करण्‍याचा प्रस्‍ताव मंञिमंडळासमोर असून तसा निर्णय लवकरच घेतला जाईल. दारुबंदी असलेल्‍या जिल्‍ह्यात दारुचा कारखाना सुरु करण्‍याच्‍या या प्रस्‍तावाला महाराष्‍ट्रातल्‍या अनेक प्रसिध्‍द समाजसेवकांनी विरोध दर्शवला होता. सेवानिवृत्त न्‍या. चंद्रशेखर धर्माधिकारी तसेच चंद्रपूरचे माजी खासदार व राज्‍यमंत्री श्री. शांताराम पोटदुखे यांनी मुख्‍यमंत्र्यांना पत्रे लिहिली होती. डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी मुख्‍यमंत्र्यांना नैतिक, सामाजिक व आर्थिक कारणांसाठी असे न करण्‍याचे जाहीर आवाहन केले होते. गडचिरोली जिल्‍ह्यातून अनेक नेत्‍यांनी, बचत गटांनी व जवळपास 25,000 लोकांनी सह्यांचे निवेदन शासनाला पाठवून हा प्रस्‍ताव रद्द करण्‍याचे आवाहन केले होते. महाराष्‍ट्रातील समाजोन्‍मुख युवांच्‍या निर्माण„ या संघटनेनेही या प्रस्‍तावाचा विरोध दर्शवून "आदिवासींना पोषण हवे व्‍यसन नको" अशी भूमिका मांडली होती. मोहफुलाचे आहार, पोषण व औषधीमूल्‍य यावर निर्माणच्‍या अभ्‍यास गटाने एक पुस्तिका देखील बनवली होती. डॉ. अनिल अवचट, श्री. दत्ता बाळसराफ यांनी देखील हा प्रस्‍तावित कारखाना रद्द करावा अशी मागणी शासनाकडे केली होती. महाराष्‍ट्राच्‍या विविध भागातून समाज सेवकांनी व लोकांनी मुख्‍यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रस्‍तावाला विरोध प्रकट केला होता.

न्‍या. चंद्रशेखर धर्माधिकारी आणि डॉ. अभय व राणी बंग यांना महाराष्‍ट्र शासनाच्‍या गृह विभागाने नुकतीच दोन पत्रे पाठवून "असा कारखाना सुरु करण्‍याची परवानगी शासनाने कुणालाच दिलेली नाही व असा प्रस्‍ताव विचाराधीन नाही" ही शासकीय भूमिका कळवली आहे.

मंत्र्यांच्‍या वक्‍तव्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन डॉ. बंग यांनी केले असून यासाठी प्रयत्‍न करणा-या सर्व समाजसेवक, कार्यकर्ते, युवा व लोकांच्‍या प्रयत्‍नांचे हे फलित आहे अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे. गडचिरोलीच्‍या व महाराष्‍ट्राच्‍या जनतेला पोषण हवे व्‍यसन नको, पाणी हवे दारु नको, द्राक्षे हवीत वाईन नको या भूमिकेचा पुनरुच्‍चार केला आहे.

No comments:

Post a Comment