Sunday, November 22, 2009

नामदार बबनराव पाचपुतेंना अकरा प्रश्न

२० नोव्हेम्बर लोकसत्ता विशेष लेख

नामदार बबनराव पाचपुतेंना अकरा प्रश्न Print E-mail
शुक्रवार, २० नोव्हेंबर २००९
नामदार बबनराव पाचपुते
महाराष्ट्राचे नवीन आदिवासी विकासमंत्री झाल्यावर आपण आदिवासी भागातून ५० हजार टन मोहफुले गोळा करून त्याची दारू (‘हर्बल लिकर’) बनविण्याची मोठी योजना आखली असल्याची ठळक बातमी आहे. (लोकसत्ता, १६ नोव्हेंबर) यातून आदिवासींना व्यवसाय मिळेल असा आपला दावा आहे. गेल्या वर्षापासून आपण व आपल्या मागे गोळा झालेले काही राजकीय नेते या योजनेचा वारंवार उच्चार करीत आहात. आता तर प्रत्यक्ष आदिवासी विकास मंत्रीच झाल्यामुळे आपल्या हाती ही कल्पना राबवण्याची सत्ताही आली आहे. ही मोठी धोकादायक स्थिती आहे. महाराष्ट्राच्या व आदिवासींच्या वतीने आपल्यासमोर काही प्रश्न ठेवतो.
१. मोहापासून दारू बनविण्याची आदिवासींची पारंपरिक पद्धत आहे. ती अपुरी वाटली म्हणून तुम्ही आदिवासींना दारू पुरविण्याची ही नवी योजना मांडली आहे काय? दारू प्याल्यामुळे माणसाचा शारीरिक, बौद्धिक, आर्थिक व नैतिक विकास होतो का? मोहाची दारू ही आदिवासीची अत्यंत मोठी कमजोरी आहे हे सर्वज्ञात आहे. मोहापासून कारखान्यात दारू महोत्पादन होऊन ती बाजारात आल्यावर त्या दारूचा सर्वात मोठा गिऱ्हाईक व बळी आदिवासीच होणार नाही का? त्यामुळे त्याचे हित होईल की अहित? तुम्ही आदिवासींचा विकास करू इच्छिता की विनाश?
२. निवडून आल्याबरोबर व आदिवासी विकास मंत्री बनल्याबरोबर तुम्हाला आदिवासींची निरक्षरता, अंधश्रद्धा, गरीबी, दारूचे व्यसन, नक्षलवाद, कुपोषण, बालमृत्यू, भ्रष्टाचार, जंगलावरील अधिकार, आरोग्यसेवा व आश्रमशाळांची वाईट अवस्था, हे सर्व प्रश्न न दिसता दारू पुरवठा हीच प्रश्नथमिकता का वाटली?
३. तुमच्या सोबत महाराष्ट्रातील ‘मोह-गँग’चे अन्य लाभार्थी कोण? या ‘मोह-लूट’ योजनेचे लोणी ते आपसात कसे वाटणार याचा प्लॅनही महाराष्ट्राला सांगावा. उसापासून देशी दारू, द्राक्षांपासून वाईन व आता मोहफुलांपासून कायदेशीररीत्या आदिवासीसाठी स्पेशल दारू असल्या योजना तुम्हा नेत्यांना का सुचतात?
४. मोहफुले हा आदिवासींचा खाद्यपदार्थ व पूरक-आहार आहे. तो विकत घेऊन त्या ऐवजी पुरुषाच्या हातात रोख रक्कम दिल्यावर त्या रकमेचा उपयोग कुटुंबातील स्त्री व मुलांना अन्न-वस्त्रासाठी होईल की दारू पिणे व जुगार यावर उडवला जाईल?
५. मोहापासून दारूमुळे आदिवासी भागातील कुपोषण व बालमृत्यूंचे प्रमाण वाढेल ते कसे थांबवाल?
६. कापसासारख्या नगदी पिकाचा शेतकरी कर्जबाजारी होतो व शेवटी आत्महत्या करतो हा विदर्भाचा प्रश्न ताजा असताना तुम्ही मोहफुलांना नगदी पीक बनवून आदिवासींना आत्महत्यांसाठी प्रेरित करू इच्छिता का?
७. मोह-लूट योजनेमुळे आदिवासी भागांमध्ये व्यसन, गुन्हे, गरीबी, कुपोषण व आत्महत्या वाढल्यावर त्यासाठी उपाय म्हणून एखादे सबसिडींचे पॅकेज केव्हा जाहीर करणार? त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेवर कोणता नवीन कर लावणार? त्या रकमेत पुन्हा कोणाचा वाटा किती राहणार?
८. आदिवासींच्या हितांचे व परंपरांचे संरक्षण करणे ही शासनाची संवैधानिक जबाबदारी आहे. तिला तिलांजली देऊन तुम्ही संवैधानिकरित्या शासकीय मंत्री कसे राहू शकाल?
९. ‘कारखान्यात निर्मित दारू विकत मिळाल्यास आदिवासी त्याला बळी पडतात म्हणून भारतातील आदिवासी भागात दारूची विक्री करू नये, असलेली दुकाने बंद करावी व पारंपरिक दारू लोकशिक्षणाद्वारे क्रमश: कमी करावी’ अशी भारत सरकारची अधिकृत ‘आदिवासी भागांसाठी मद्यनीती’ स्व. इंदिरा गांधींनी बनवून घेतली आहे (१९७६). ती महाराष्ट्राने अधिकृतरित्या स्वीकारली आहे (१९७७). हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही ही शासकीय नीती विसरलात का? स्व. शंकरराव चव्हाणांनी स्वीकारलेली ‘आदिवासी विभागांसाठी मद्यनीती’ (१९७७) आता अशोकराव चव्हाणांच्या राज्यकाळात उलटी होणार का?
१०. या पूर्वी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व डॉ. अभय व राणी बंग यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना या प्रस्तावित कल्पनेबाबत पाठवलेल्या पत्रांच्या उत्तरात ‘शासनाचा असा कोणताच प्रस्ताव नाही.’’ असे अधिकृत उत्तर आलेले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे हे पत्र व आपण प्रस्तावित योजना यात विसंगती आहे.
११. आदिवासींची गरीबी व अविकास यातून तिथे नक्षलवाद फोफावला. तुमच्या या मोह-लूट योजनेमुळे आदिवासींची लूट वाढणार. त्यामुळे नक्षलवाद वाढणार नाही का?
‘महाराष्ट्र शासनापेक्षा आम्ही आदिवासींच्या हिताचे खरे रक्षक आहोत’ असा दावा नक्षलवाद्यांनी केल्यावर तुम्ही तो कसा खोडून काढणार? तुमच्या मोह-लूट योजनेतील भागीदार व एजंट नेते सोडल्यास कोणते आदिवासी तुमच्यावर विश्वास ठेवणार?
नक्षलवाद्यांनी पूर्वी दारूविरुद्ध कर्यक्रम आंध्र प्रदेशात घेतले आहेत. तुमच्या प्रस्तावित मोह-लूट योजनेला त्यांनी विरोध केल्यास नैतिक विजय कोणाचा होईल? तुम्ही नक्षलवाद्यांना नवीन मुद्दा व कार्यक्रम का पुरवू इच्छिता?
आपण या घातक कल्पनेला पुढे नेण्याऐवजी आदिवासी, कार्यकर्ते व आमच्यासोबत प्रथम चर्चा करावी असे आम्ही आपल्याला आवाहन करतो.
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अण्णा हजारे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, देवाजी तोफा.

No comments:

Post a Comment