Sunday, November 22, 2009

आदिवासी विकास मंत्र्यांच्या अकलेचे दिवाळे- एकनाथ खडसे

लोकसत्ता २० नोव्हेम्बर

आदिवासी विकास मंत्र्यांच्या अकलेचे दिवाळे- एकनाथ खडसे

नाशिक, २० नोव्हेंबर / प्रतिनिधी
मोहाच्या दारू निर्मितीतून आदिवासींच्या विकासाच्या गोष्टी राज्याचे मंत्री करणार असतील तर त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले असेच म्हणावे लागेल, असा टोला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. वारकरी पंथीय बबनराव पाचपुते हे वारकऱ्यांनाही हीच शिकवण देणार आहेत काय, असा सवालही त्यांनी येथे केला.
मागील आठवडय़ात वादळी पावसाने जिल्ह्य़ात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीकडून महात्मा गांधींच्या नावाने मते मागितली जातात. गांधींनी कधीही दारूचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी मोहाच्या दारूच्या माध्यमातून आदिवासी विकासाच्या गोष्टी करणे हे गैर आहे, असे खडसे यांनी सांगितले. जिल्ह्य़ात वादळी पावसाने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून आपण मालेगाव, नांदगाव, पिंपळगाव बसवंत, पेठ, सुरगाणा येथील नुकसानीची पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले. द्राक्ष उत्पादकांचा एकरी खर्च एक लाख रूपये धरल्यास त्यांना बसलेल्या दुहेरी फटक्याचा अंदाज येईल. शासनाने द्राक्ष उत्पादकांना ५० हजार रूपये हेक्टरी मदत करावी, त्यांना शंभर टक्के कर्जमाफी करावे तसेच त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी दीर्घ मुदतीवर व कमी व्याजदराने कर्ज द्यावे, डाळिंब बागांवर पडणाऱ्या रोगांसाठी शासनाकडून देण्यात येणारी मदत एकरी २० हजार रूपये करण्यात यावी, तसेच डाळिंब व द्राक्षांचा पीक विमा योजनेत समावेश करावा, अशा मागण्याही खडसे यांनी केल्या. मुंबईत आयबीएन-लोकमतच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून या हल्ल्याचे कदापि समर्थन होऊ शकत नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

No comments:

Post a Comment