Monday, November 23, 2009

मोह दारु गाळण्यापेक्षाही आरोग्यासाठी अधिक गुणकारी !

लोकसत्ता २१ नोव्हेम्बर

मोह दारु गाळण्यापेक्षाही आरोग्यासाठी अधिक गुणकारी !

नाशिक, २१ नोव्हेंबर / विशेष प्रतिनिधी
पंढरीचे सेवेकरी ह.भ.प बबनराव पाचपुते मंत्री म्हणून आदिवासी विकास खात्याचा कारभार सांभाळते झाल्यावर त्यांना ‘मोह’ अनावर झाला अन् त्याच भरात काही जुजबी कल्याणकारी योजनांसोबत मोहाच्या फुलापासून दारु (हर्बल लीकर) तयार करण्याबाबतच्या प्रस्तावासंदर्भातही ते बोलते झाले. वास्तवत: मोहाची फुलं जेवढी म्हणून दारुसाठी उपयुक्त असल्याचे भासविले जाते, त्याहून काही पटीने ती आरोग्यासाठी गुणकारी आहेत. त्यामुळेच या फुलांचा अन् ती गळून पडल्यावर टोळंबी नामक फळांचा आदिवासी समाज पोषक आहार म्हणूनही वापर करतो या उपयुक्ततेकडे मात्र मंत्रिमहोदय सोयिस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत, अशी टीका आदिवासी कार्यकर्त्यांकडून होवू लागली आहे.
आदिवासी पट्टय़ात मोहाचे झाड वा फुलं यासाठी महु हा शब्द प्रचलित आहे. मोह फुलांचा बहर ओसरल्यावर त्याच कळीतून टोळंबी नामक फळ आकाराला येवू लागते. हे झाड सुमारे दहा-पंधरा वर्षांचे झाल्यानंतर त्याला फुलांचा बहर यायला सुरुवात होते. साधारणत: मार्च महिन्यात या झाडाची पाने परिपक्व होवून गळून पडतात. नंतर झाडांच्या फाद्यांवरील कळ्या हळूहळू कोंब फुटून वाढायला लागतात. त्यांची वाढ सुमारे पंधरवडय़ात पूर्ण होताच त्यांचे मोह फुलात रुपांतर होते. त्यानंतरच्या पंधरवडा-तीन आठवडय़ात ही फुलं परिपक्व होवून आपोपच गळायला लागतात. दररोज टोपली दोन टोपली फुलं वेचून गोळा करणे, ती घरात माळ्यावर वाळत घालणे ही कामे पूर्ण केली जातात. ज्या देठापासून फुलं गळून पडतात त्याच ठिकाणी हाताच्या अंगठय़ाच्या आकाराची फळं वाढायला सुरुवात होते. ही फळं घडाच्या स्वरुपात येतात व त्यांची वाढ साधारणपणे जूनमध्ये पूर्ण होते. त्याच सुमारास मान्सूनला सुरुवात झालेली असल्याने ही फळं अर्थात टोळंबीच्या बियांचा सडा मोह झाडाच्या खाली दिसतो. फुलांप्रमाणेच टोळंबीचं बी देखील वेचणे, गोळा करणे आणि पाडय़ावरील माळ्यावर सुरक्षित ठेवणे ही कामे आदिवासी करतात. टोळंबीच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा खाद्यतेल म्हणून उपयोग केला जातो. त्यापासून निघालेली ढेप याचाही वापर जनावरांना खाद्य म्हणून वा साबण तयार करण्यासाठी होतो. टोळंबीप्रमाणेच साधारणत: वर्षांचे मोह झाड (तरु) असेल तर त्याच्या मुळ्यांचा अर्क माणूस वा जनावरांच्या डोळ्यातील फूल (टिका)काढण्यासाठी केला जातो. टोळंबीच्या तेलाचाही औषध म्हणून वापर केला जातो. आदिवासींमध्ये मोह फुलाला अन्नाचा दर्जा आहे. ही फुलं भाजल्यावर त्यापासून चटणी तयार केली जाते. त्यात अन्य कडधान्याचा वापर केल्यास पोषक आहार म्हणून त्याचा वापर होतो. थोडक्यात डोंगरदऱ्यातील आदिवासींसाठी पोटाची खळगी भरण्याचे एक प्रमुख साधन म्हणून मोहाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे, अशी माहिती नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीचे कार्यकर्ते करणसिंग कोकणी यांनी दिली. तथापि, वर नमूद केलेल्या उपयोगांकडे सोयिस्कररित्या कानाडोळा करून मोहाच्या फुलाचा वापर हा केवळ अन् केवळ दारु गाळण्यासाठीच होतो, असा समज आदिवासी विकास खात्यामार्फत पसरविला जात आहे, असा आरोपही कोकणी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

No comments:

Post a Comment